श्रीनवरात्रवासिनीची आरती

श्रीनवरात्रवासिनीची आरती
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो । । १ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु .। ।

द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो । । २ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफ़ळां हो ।
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो । । ३ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो । । ४ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो ।
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो । । ५ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ।। ६ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो ।
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो ।
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ।। ७ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो । । ८ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ।
आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो । । ९ । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो । । १० । ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।